शस्त्रक्रियेसाठी आलेली महिला सापडली ‘कोरोनाग्रस्त!
कोरोनाबाधित महिला कोपरगाव तालुक्यातील करंजी गावातील संपर्कातील १४ जणांची विलिनीकरण कक्षात रवानगी
सुरेगाव कोरोना कनेक्शन – औरंगाबाद
करंजी कोरोना कनेक्शन – वैजापूर, येवला
कोपरगाव कोरोना अपडेट :
२६० तपासण्या, १५ जण कोरोना ग्रस्त, १२ जण कोरोनामुक्त, तर एका महिलेचा मृत्यू, २१६ अहवाल निगेटिव्ह,३१ अहवालांची प्रतीक्षा
वृत्तवेध ऑनलाईन 15 July 2020
By: राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोरोनाबाधित महिला कोपरगाव तालुक्यातील करंजी गावातील असून या महिलेचा संपर्कात आलेल्या १४ संशयितांना एस. एस. जी. एम. कॉलेज मधील कोविड सेंटर विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. सध्या कोविड सेंटर मध्ये ३१ संशयित रुग्ण आहेत अशी माहिती कोपरगाव तालुका ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे म्हणाले, सदर महिला ही रविवारी वैजापूर येथील डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेली होती. तेथून ती कोपरगाव येथे शस्त्रक्रिया करण्यासाठी एका खाजगी दवाखान्यात गेली होती, परंतु शस्त्रक्रिया करण्याआधी डॉक्टरांनी तिला कोरोना तपासणी करून घेण्याचे सांगितले होते त्यानुसार सदर महिलेने खाजगी रुग्णालयात कोरोना तपासणी केली असता सदर महिलेला कोरोनाची लागण झाल्याच्या अहवाल मंगळवारी (१४ जुलै) रोजी रात्री प्राप्त झाल्याने सदर महिला व तिच्या संपर्कात आलेल्या १४ संशयितांना कोविड सेंटरमध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. व १४ गटांचे जणांचे स्वॅब तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले आहे .
डॉ. फुलसौंदर म्हणाले, सुरेगाव येथील एक इसम कोरोनाग्रस्त असुन त्यांच्या संपर्कातील १७ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहे. परंतु अद्याप त्याचे अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे कोपरगावात करंजी येथील एक स्त्री व सुरेगाव येथील एक पुरुष असे २ जण कोरोनाग्रस्त असून यांच्या संपर्कात आलेले ३१ जणांना कोपरगाव येथील कोविड सेंटरमध्ये विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे स्वॅब तपासणीसाठी नगर येथे पाठविण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे. या सर्व ३१ जणांवर डॉक्टर विधाटे संतोष विधाटे डॉ. कृष्णा फुलसौंदर व विशेष अधिकारी डॉ. वैशाली बडदे (आव्हाड) लक्ष ठेवून आहेत.





