सेवायोजन शिबीरे ही राष्ट्रीय अस्मितेसाठीच – विवेक कोल्हे.
Service camps are for national identity only – Vivek Kolhe.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun13 Fab2022 18:20Pm.
कोपरगाव : राष्ट्रीय अस्मितेची भावना जागृत होण्यासाठी राष्ट्रीय सेवायोजन शिबीरे महत्वाची असतात असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी रविवारी दहेगाव बोलका येथे ग्रामपंचायत, सावित्रीबाई फुले विद्यापीठ व सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिर समारोपात केले. प्रारंभी सरपंच साधना देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्राचार्य डॉ. आर. आर. सानप यांनी प्रास्ताविक केले.तर त्र्यंबकराव सरोदे यांनी गावच्या विकासाची माहिती दिली.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, आपल्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय जडणघडणीत महाविद्यालयीन काळात केलेल्या श्रमसंस्काराचा मोठा वाटा आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठान मार्फत तरुणांमध्ये सामाजिक संस्काराची शिदोरी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. दहेगावला देशभक्तीचा मोठा वारसा लाभला आहे. आपल्या सर्वांचे अभिमान शहीद सुनील वलटे यांची हजारो तरुणांना प्रेरणा मिळते. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांची भावना गोरगरीब कुटूंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये ही होती.
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी गावपातळी पासून सरपंच,पंचायत समिती सभापती,आमदार,मंत्री, शिक्षणसंस्था, कारखाना यातून परिसराचा कायापालट केला व आजही ९४ वर्षे वय असतांना ते सर्व संस्थांना भेटी देतात.यावरून ही गोष्ट निदर्शनास येते की आपण सामान्य कुटूंबातून असलो तरीही शिक्षणाचा व ज्ञानाचा फायदा आपल्या भागाला,परिसराला व देशाला करून देण्यासाठी कार्य करता येते फक्त त्यासाठी मेहनत व जिद्द आवश्यक आहे. आपण रोज काही ना काही योगदान द्यावे हे विचारात घेऊन कार्य करत रहावे असे विवेक कोल्हे शेवटी म्हणाले.
याप्रसंगी रवींद्र देशमुख, निलेश सरोदे, संतोष देशमुख, गणेश जाधव, डॉ.गुलाबराव वरकड, बाबासाहेब आभाळे, ग्रामसेवक आर.पी. सय्यद,डॉ.रणधीर, डॉ.महाले, डॉ.वाघमोडे, दिघे सर यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. शेवटी कोल्हे कारखान्याचे माजी संचालक डॉ. गुलाबराव वरकड यांनी आभार मानले.





